Monday, August 29, 2016

मला सैराट का करता?



परवाच एका न्यूज ग्रुपवर फोटो पडला. डाऊनलोड करुन पाहिला आणि हसावं की रडावं तेच कळेना. पुण्याच्या उपनगरातल्या एका गणपती मूर्तींच्या विक्री स्टाॅलवर सैराटच्या रुपातल्या गणपतीच्या मूर्ती विक्रीला आल्याची ती बातमी होती आणि त्या सोबत फोटोही होता. बुलेटवर आर्चीच्या रुपात स्वार झालेली डोळ्यांना गाॅगल चढवलेली ती गणेशमूर्ती त्या फोटोत पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. गेल्या ब्लाॅगमध्ये मी दहिहंडीच्या उत्सवात शिरलेल्या गैरप्रथांबद्दल लिहिलं होतं. त्याला आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण सध्या केवळ हिंदूंच्याच सणांबद्दल लिहिलं जातं असाही काहींचा सूर होता. त्यांच्या अभिव्यक्तीचा आदरच आहे. पण आपल्या धर्मात शिरलेल्या वाईट प्रथा डोळ्यांआड करुन दुसऱ्या धर्मांतल्या प्रथा-परंपरांकडे डोकावून पहायचं, हे कितपत योग्य आहे.

सहज इंटरनेटवर पहात असताना गेल्या गणेशोत्सवाच्या काळातली एक बातमी वाचनात आली. गेल्या वर्षी म्हणे बाजीराव फेम गणपती, बाहुबली, जय मल्हार फेम गणपती अशा विविध रुपांतल्या गणेशमूर्ती बाजारात आल्या होत्या. आता गणपतीला स्वतःचे एक सुंदर रुप आहे. ते त्याला सोडायला लावून दुसऱ्याच्या रुपात जाणे भाग पाडायचे कारण काय, असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही.

सुंदर घडवलेल्या गणेशमूर्तीकडे पाहिलं की मनाला आपोआपच प्रसन्नता येते. सर्वसाधारणतः आसनस्थ, उभी आणि नृत्यात रमलेली अशा तीन प्रकारच्या मूर्ती पहायला मिळतात. प्रत्येक मूर्तीच्या चेहेऱ्यावरचे भाव वेगवेगळे असले तरीही मूळचे पावित्र्य त्यात लपत नाही. पुण्याचा त्रिंशुंड गणपती असो वा श्रींमंत दगडुशेठ हलवाई गणपतीची मूर्ती असो अथवा लालबागच्या राजाची भव्य मूर्ती असो, पाहिलं की हात आपोआप जोडले जातात. मध्यंतरी ज्ञानेश्वरीची चौदाव्या शतकात केलेल्या एका नकलेची छायाचित्रे पाहण्यात आली.....त्यात ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेला सहा हातांचा गणेश चितारण्यात आला आहे. हे चित्र पहायलाही सुंदर वाटते
 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात म्हणे गांधी, नेहरूंच्या रुपातल्या गणेशमूर्ती पुण्याच्या सार्वजनिक गणपती मंडळांच्या मांडवात विराजमान झाले होते. ते दिवस वेगळे होते. प्रत्येकाला कुणाच्या रुपात देव दिसेल हे सांगणे महाकठीण.
गणराया लवकरी येई I भेटी सकलासी देई IIअंगी सिंदुराची उटी I केशर कस्तुरी लल्लाटी IIपायी घागर्‍या वाजती I नाचत आला गणपती IIतुका म्हणे पाही I विठ्ठल गणपती दुजा नाही II
असं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजच म्हणतात.....
या सगळ्याला एक पावित्र्य आहे, मनापासूनच्या भावना आहेत. पण म्हणून सैराट गणपती, बाहुबलीच्या रुपातला, जय मल्हार गणपती, डायनासोरवर बसलेला गणपती?

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते. म्हणजे निर्जीव मूर्तीत प्राण आणले जातात. त्या दिवशी अशा विचित्र गणेशमूर्तींसमोर आरसा ठेवला ती मूर्ती नक्की म्हणेल, “तुमच्यातला सैराटपणा कमी करण्यासाठीच मी आहे. पण म्हणून काय तुम्ही मलाच सैराट बनवाल? माझं तुंदीलतनू, लंबोदर, चार आयुधे धारण केलेले रुप किती छान आहे. तुम्ही दिलेले मोदक मी खायचे की बुलेटचे हँडल सांभाळायचे. बाबांनो राहू द्या ना मला माझ्या मूळ रुपात"

Saturday, August 20, 2016

कुठल्या प्रथा...कुठल्या परंपरा

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दहीहंडीच्या उन्मादाला चाप लावणारा निर्णय दिलाय. त्यामुळे राजकीय पक्ष अस्वस्थ झालेत. विशेषतः जे या सण-उत्सवांकडे मतं गोळा करण्याची संधी म्हणून पाहतात त्यांना तर या निर्णयामुळे दुःखाचे उमासे यायला लागलेत. आमच्या संस्कृतीवर-परंपरांवर आक्रमण झाल्याची ओरड त्यांनी सुरु केलीये. त्यात उजवे आहेत तसे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारेही आहेत. मात्र, तुम्ही ठरवाल ती संस्कृती आणि मानाल त्या परंपरा हा भंपकपणा आहे, हे कुणीतरी या मंडळींना सांगायला हवे. हिंदू संस्कृतीच्या नांवाखाली उर बडविणाऱ्या या मंडळींना कृष्णजन्म- गोपाळकाला या विषयी काही माहिती आहे का हे त्यांचे बाईट्स चघळणाऱ्या वाहिन्यांनी त्यांना कधीतरी विचारले पाहिजे. 

श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला.गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला' होय. श्रीकृष्णाने गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. 
अधिक संदर्भासाठी - http://www.m4marathi.com ही वेबसाईट अवश्य पहा.)

अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये श्रीकृष्णाच्या मंदीरात किंवा ग्रामदेवतेच्या मंदीरात कृष्णजन्माचा उत्सव साजरा केला जातो. एका काठीला हंडी बांधून ती फोडली जाते आणि मग काल्याचा प्रसाद सर्वांना वाटला जातो. यातूनच पुढे दहीहंडीचा उत्सव साजरा करायला सुरुवात झाली. काळाच्या ओघात याचे धार्मिक स्वरुप केव्हाच मागे पडले आणि उरला तो फक्त सैराटपणा. 
आज ही नेतेमंडळी ज्या परंपरांबाबत बोलत आहेत त्यात या परंपरा कुठे बसतात?
- थरावर थर लावून गोविंदांचे जीव धोक्यात घालायचे ही कुठली परंपरा
- वर चढणाऱ्या गोविंदांंच्या अंगावर पाण्याचे फवारे मारुन त्यांना खाली पाडायचे ही कुठली परंपरा
- लहान मुलांंना सर्वात वरच्या थरावर चढवून त्यांच्याकडून हंडी फोडून घ्यायची ही कुठली परंपरा
- सकाळपासून डीजे लावून त्यावर नाचाच्या नांवाखाली धिंगाणा घालायचा ही कुठली परंपरा
- हंडीचे थर कमी करायचे आणि जाहीर केलेल्या लाखो रुपयांच्या बक्षिसाची रक्कम कमी करत करत गोविंदा पथकांच्या हाती टीचभर पैसे टिकवायचे ही कुठली परंपरा
- दहिहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून एका बेकरीतल्या गरीब कामगारांना भररस्त्यात उठाबशा काढायला लावायचे ही कुठली परंपरा 
- दहिहंडी उत्सवाच्या व्यासपीठावर सुपाऱ्या घेऊन येणाऱ्या कलाकारांना (विशेषतः महिला) नाचवायचे ही कुठली परंपरा (पुण्याच्या उपनगरातल्या एका गुंठामंत्र्याने एके वर्षी दहीहंडीला सनी लिओनीला आणणार असल्याचे जाहीर केले होते) नेतेमंडळींच्या मनात याच 'प्रथा-परंपरा' असतील तर त्या मोडल्या तर बिघडले कुठे? किंबहुना त्या मोडायलाच हव्यात. 
या विकृतीचे वेड एका उत्सवापुरते मर्यादित राहिलेले नाही. गणेशोत्सवावर टीका व्हायलाच लागली आहे. ढोल-ताशा पथके वाढली तरी उत्सवावर `मुंगळा-मुंगळा, शांताबाई' चा प्रभाव दिसतोच आहे. ढोल-ताशा पथके ही देखिल या उत्सवाचे नवे मालक बनलेत. 

स्वातंत्र्यदिन साजरा करतानाही या विकृतीचे दर्शन घडायला लागले आहे. चौकात राष्ट्रध्वज उभारून सकाळी 'ए मेरे वतन के लोगों' ने सुरुवात करायची आणि संध्याकाळी 'ड्राय-डे' असूनही कष्टाने मिळवलेल्या 'तीर्था'चे प्राशन करुन 'झिंग झिंग झिंगाट...' च्या तालावर स्वातंत्र्यदिन सार्थकी लावायचा, हे चित्र आता नवे राहिलेले नाही. 

एक गाणे किती वेळा वाजवायचे यावरही कुठलेही बांध नाहीत. पुण्याच्याच मध्यवस्तीत ऐकलेला हा किस्सा बोलका आहे. या मध्यवस्थीत एका चौकात एके वर्षीच्या गणेशोत्सवात नाचणाऱ्या मोराचा देखावा तिथल्या मंडळाने केला होता. पु.लं. नी लिहिलेल्या 'नाच रे मोरा..' या सुंदर गीताचे रिमिक्स या देखाव्याचे पार्श्वसंगीत म्हणून वापरण्यात आले होते. मंडपावरचा पडदा दिवसभर बंद असला तरीही सकाळी सात पासून हे गाणे सुरु व्हायचे, ते थेट रात्री मंडप बंद होईपर्यंत. मंडळाच्याच जवळ राहणाऱ्या एका गृहस्थांच्या खिडकीसमोरच स्पीकर होता. हे गृहस्थ एवढे वैतागले होते की, 'दहा दिवसांत नाच रे मोरा एवढ्या वेळा ऐकलंय की आता xxxला मोराचा पिसारा फुलल्यासारखं वाटतंय,' असं एकाशी बोलताना ते उद्वेगाने म्हणाले होते. 

हे उत्सव, सण-अशाच पद्धतीने सुरु राहिले तर पुढच्या पिढ्या त्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही, हे नक्कीच आहे. लोकमान्यांनी लोकांना एकत्र करण्यासाठी घरातला गणपती रस्त्यावरच्या सार्वजनिक मंडपात आणला. आता सर्वच सण-उत्सव रस्त्यावर साजरे व्हायला लागलेत. त्यांचा एवढा अतिरेक झालाय की 'न्या ते सण-उत्सव पुन्हा चार भिंतींच्या आत,' असे म्हणायची वेळ आलीये.